पुणे : खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे हप्ता देण्याची मागणी करून हातगाडीची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रकार वडगाव येथील चरवड वस्तीत घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तानाजी मरगळे व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खाद्यपदार्थ विक्रेत्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कच्छी दाबेली विक्रीचा व्यवसाय आंबेगाव बुद्रूक परिसरात करतात. त्यांच्या गाडीवर आसिफ सिद्दीकी कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी तानाजी मरगळे आणि दोन साथीदार गाडीवर आले. बिट्ट्या पाडळेने पाठविले असून या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दररोज १०० रुपये हप्ता द्यावा लागेल, असे त्यांनी त्याला सांगितले. खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे कामाला असलेला कामगार सिद्दिकीने या प्रकाराबाबतची माहिती विक्रेत्याला दिली. त्यानंतर मरगळे आणि साथीदार खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या घराजवळ आले. त्याच्या घराच्या दरवाजावर कोयता आपटून पसार झाले. त्यानंतर ते कच्ची दाबेलीच्या गाडीवर जाऊन गाडीचे नुकसान केले.