पुणे : कोरोना टाळेबंदीचा सर्वाधित फटका बसलेल्या रिक्षा चालकांच्या मागण्या जिल्हा वाहतूक प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत प्राधान्याने चर्चेसाठी टेवाव्यात असा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना दिला.
रिक्षा पंचायतीच्या वतीने कोरोना संकटकाळाच्या अनुषंगाने विविध मागण्यांच्या पुर्तततेसाठी पुण्यातील विधानभवनासमोर सुर्योदय ते सुर्यास्त असे उपोषण बुधवारी केले. टाळेबंदीत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सहा महिन्यांचा कर माफ करावा, विम्याची मुदत वाढवून मिळावी या व अन्य काही मागण्या मागील ४ महिन्यांपासून रिक्षा पंचायत करत आहेत. स्थानिक प्रशासनापासून ते राज्य प्रशासनापर्यंत व आमदारांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सनदशीर मार्गाने अनेकदा मागण्या मांडल्या असे पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त राव यांनी दुपारी या आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी त्यांना पंचायतीने मागण्यांसाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. कुठेही तड लागत नसल्यानेच उपोषण करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर राव यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांच्या सर्व मागण्या प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत प्राधान्याने घ्याव्यात असे सांगितले.
पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, लोकायतचे नीरज जैन, अलका जोशी, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सचिव शैलजा चौधरी तसेच मन्सूर सय्यद, गौतम सवाणे, ईश्वर मांजरेकर, शैलेश गाडे, काशीनाथ शेलार आंदोलनात सहभागी झाले होते.