पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२१२ मावळ्याचा नवा इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने अर्ध्यावर राहिला असल्याची भावना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवचरित्रावर कार्य केले आहे. परंतू या मावळ्यांचा इतिहास आता कायमच काळाच्या पडद्या आड राहिला असेही ते यावेळी म्हणाले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच पुण्यात निधन झाले. पुण्यातील एका खासगी संस्थेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
सोलापूरकर म्हणाले,“शिवछत्रपतींनी उभे केलेले २८४ किल्यांचे साम्राज्य बाबासाहेबांनी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवले आहे. त्यात एक विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाराजांनी कोणत्याही किल्यावर स्वतःचे नाव लिहून ठेवलेले नाही. रायगडावर जो उल्लेख सापडतो तो म्हणजे ज्याने हा किल्ला निर्माण केला त्या संदर्भातील आहे. अशाप्रकारे इतिहासातील अत्यंत सुक्ष्म अध्ययन बाबासाहेब करीत असे. त्यांचे शिवसृष्टी निर्मितीचे स्वप्न पूर्ण करू.
तसेच जगभरातील बर्याच विद्यापीठांमध्ये शिवरायांवर अध्ययन केले जाते याचे श्रेय त्यांना जाते. सध्या देशातील नव्या पाठ्यक्रमांमध्ये शिवरायांचे १६ धडे अभ्यासक्रमात आणले आहेत. बाबासाहेबांच्या जीवनात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. परंतू शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी सहनशीलतेच्या जोरावर त्याचा सामना केला असेही त्यांनी सांगितले आहे.