पुणे : संगीताची उत्तम जाण असणारा, संगीत क्षेत्रात कार्यकर्त्याच्या भूमिकेत सदैव वावरणारा, सर्वसामान्यांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी झटणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला हरहुन्नरी, अष्टपैलू हाडाचा स्वयंसेवक गमावला असल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
विनय चित्राव यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी म्हणाले, कोविडमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले. त्याचा सर्वात मोठा फटका कला क्षेत्राला बसला आहे. कोविडमुळे अलीकडे ज्या कलाकारांचे निधन झाले ते गायन आणि वादन क्षेत्रातील गंधर्वांचे अवतार होते. विनय हा अभिषेकी परिवारातील एक होता. त्याने गांधर्व महाविद्यालयाला वाहून घेतले होते. अकल्पित आणि अविश्वसनीय अशीच ही घटना म्हणावी लागेल.
प्रसिद्ध गायक आनंद भाटे म्हणाले, विनयचा स्वभाव मनमिळावू होता. तंबोरे लावण्यात त्याचा हातखंडा होता. तंबोरा या वाद्याविषयी त्याच्या मनात प्रेम आणि आदर होता. कार्यक्रमस्थळी वाद्य नेणे, ते परत व्यवस्थित आणणे या सगळ्या जबाबदाऱ्या तो एकट्याने पार पाडायचा. साथ संगतीला तो सोबत असल्याचा मोठा आधार वाटायचा. तो केवळ संगीत साथीपुरता मर्यादित नव्हता, तर त्याचे भावबंध मित्रत्वापर्यंतचे होते.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले, आमची दोघांची विचारधारा भिन्न होती. पंरतु आमच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही.
शैलेश टिळक, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे, हृषीकेश बडवे, गायिका रेवती कामत, सौरभ काडगांवकर, हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, ज्योत्सना सरदेशपांडे, वरूण पालकर, आशय परिवाराचे आजीव सदस्य राजकुमार सुराणा, वन्यजीव अभ्यासक स्वप्नील कुंभोजकर, अल्पना तळेगांवकर, विशाखा जोशी यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली.
-------------------------------------------------------------------------