धायरी: खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धरण चौपाटीवरील सेल्फी पॉईंटची तोडफोड अज्ञात समाजकंटकांनी केली आहे. हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करण्यात आले होते.
त्यानंतर 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंच यांचा नामफलक तोडण्यात आला होता. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई व धरणाच्या पाण्यात दिसणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब यांमुळे खडकवासला धरणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मात्र काही समाजकंटकांनी केलेल्या तोडफोडीमुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.