- विशाल दरगुडे
चंदननगर : नोटाबंदीला आज वर्ष होत आहे; मात्र या नोटाबंदीचा फायदा किती व तोटा किती? याचा अभ्यास केला गेला तर या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम निश्चितच झाला आहे. वडगाव शेरी, चंदननगर परिसरात तुडुंब गजबजणाऱ्या बाजारपेठा आज वर्षानंतरही ओसच पडल्या आहेत. त्यांच्यात जराही बदल झालेला नाही. व्यवसाय कोसळला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सराफी, कापड, व्यापारी, भाजीविक्रेते यांच्यासह अनेक लहान व्यवसायांवर नोटाबंदीचा प्रभाव प्रचंड पडल्यामुळे वर्षभरापासून व्यवसाय मंदीत असून आजही मंदी कायम आहे.
सगळे व्यवहार ऑनलाइन केल्यामुळे बाजारपेठात जाणाऱ्यांची संख्या खूपच घटली असून, नागरिक कपड्यांपासून ते अगदी औषधांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी ऑनलाइन करू लागल्याचा परिणाम बाजारपेठांवर होऊ लागला आहे. नोटाबंदीमुळे व्यवसायावर पन्नास टक्के परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे फार कठीण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून छोटे व्यापारी व्यवसाय बंद करून, नोकरी शोधत आहेत.
चंदननगर - वडगाव शेरी व्यापारी पेठेत कोट्यवधींची उलाढाल होत होती; मात्र गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर नागरिकांकडे पैसे उरले नाहीत. बँकेत पैसे असूनही ते काढता येत नाहीत. त्यावर बंधने आहेत. त्यामुळे कोणताही रोखीने व्यवहार होत नसल्यामुळे सर्वच व्यवसाय आज वर्षानंतरही ठप्प आहेत. जीएसटीमुळे तर पूर्णपणे अर्थकारण कोसळले असून, छोट्या व्यावसायिकांना कागदपत्रे जमा करण्यात मोठा गोंधळ होत आहे. किरकोळ व्यापारीही संभ्रमात पडला आहे.
परिसरात जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र नोटाबंदीनंतर नागरिकांकडे व्यवहार करण्याएवढे पैसे नसल्यामुळे कोणताही मोठा जमीन खरेदीचा व्यवहार होत नसल्यामुळे वकिलांचा व्यवसायही ऐंशी टक्केही होत नाही.एकंदरीत सर्वांचेच अर्थकारण ठप्प झाले आहे. नोटाबंदीचा फायदा नाही, तर तोटाच झाला असल्याचे नागरिकांमधून सांगितले जाते.