लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल जालना येथे अपशब्द वापरले, याचा निषेध पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. दानवे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पुरंदरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. शेतमालाला बाजारभाव नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे डोळे लावून बसले आहेत; परंतु सरकार वेळकाढूपणा करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशा परिस्थिती भाजपाचे अध्यक्ष शेतकऱ्यांना ‘साले’ हा शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने दानवे यांचा निषेध करून, ‘साला’ ही पदवी त्यांनाच बहाल करीत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी निवेदन स्वीकारले.या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, युवक अध्यक्ष विकास इंदलकर, बारामती लोकसभा अध्यक्ष सचिन दुर्गाडे, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक गणेश जगताप, संदीप फडतरे, साहेबराव फडतरे, सागर घाडगे, लक्ष्मण वाघापुरे, अमित रणनवरे, गणेश कामठे, मोमीन बागवान, सागर कुंभारकर, नामदेव पवार, शहाजीतात्या फडतरे आदी उपस्थित होते.
पुरंदर काँग्रेसच्या वतीने दानवेंचा निषेध
By admin | Published: May 13, 2017 4:22 AM