लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील बहुचर्चित २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटींचे कर्जरोखे उभारण्यात आल्याच्या निषेधार्र्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महापालिकेला कर्जबाजारी करण्याच्या सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.शहरातील बहुचर्चित २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटींचे कर्जरोखे पुढील ५ वर्षांत उभारण्यात येणार आहे. त्यापोटी पालिकेला ७.५९ टक्के दराने व्याज अदा करावे लागणार आहे. व्याज आणि मुद्दलाची रक्कम दहा वर्षांत फेडायची आहे. कर्जरोखे नोंदणीचा कार्यक्रम मुंबईतील शेअरबाजारात नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गुरुवारी पार पडला. याच्या निषेधार्थ मंडई येथे निर्दशने करण्यात आली.त्यातील पहिल्या टप्यातील २०० कोटींच्या कर्जरोख्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारात सकाळी पार पडला. मात्र या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अर्थसाह्य घेऊन ही योजना पूर्ण करावी, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मात्र पालिका कर्ज काढून ही योजना राबवित असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने मंडईमधील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील बहुचर्चित २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटींचे कर्जरोखे उभारण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाच्या डोक्यावर साडेसात हजारांचे कर्ज असणार आहे, अशी टीका अरविंद शिंदे यांनी यावेळी केली.
कर्जरोख्यांविरोधात निदर्शने
By admin | Published: June 23, 2017 4:51 AM