मनोहर बोडखे / दौंडपुणे-दौंड, बारामती मार्गावर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या डेमू सेवेची रडकथा सुरु झाली असून त्याचा फटका गुरुवारी असंख्य प्रवाशांना बसला. बुधवारी रात्री डेमू दौंडला आली़ तेव्हा तेथे गाडीत डिझेल भरण्यासाठी आवश्यक असा एडपटरच नसल्याचे लक्षात आले़ त्यामुळे दौंड वरुन निघण्यास डेमूला उशीर झाला़ पुण्यात आल्यावर गाडीत डिझेल भरावे लागले़ सकाळपासूनच डेमूच्या प्रवासात विघ्न येऊ लागले़ दौंडवरुन येणाऱ्या रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुण्याहून सकाळी १०.३०ला सुटणाऱ्या ही गाडी ८० मिनिटे उशीरा सुटली़ पुढे ही लोकल लोणी काळभोर स्टेशनमध्ये आल्यानंतर इंजिनात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे समजले. त्यामुळे ही लोकल अर्धा तास थांबलेली होती. दुपारी २ च्या सुमारास लोकल दौंड रेल्वे स्थानकात आली. पुण्याहून येणाऱ्या गाडीला उशीर झाल्याने दौंडहून सुटणारी दुपारची गाडी ६० मिनिटे उशीरा सुटली़ त्यामुळे गुरुवारी प्रवाशांचा मनस्ताप झाला़ बुधवारी डेमूची दुसरी फेरी पुण्यातून दुपारी २ वाजता होती; प्रत्यक्षात ती ४ ला पुण्यातून सुटल्याने दौंडला सायंकाळी ६.३०ला आली. परतीच्या प्रवासाला पुण्याला उशिरा पोहोचली. पुन्हा हीच डेमू लोकल पुणे-बारामतीच्या परतीच्या प्रवासाला ६.४५ ला पुण्यातून सुटणे अपेक्षित होते; मात्र ती पुण्यात उशिरा पोहोचल्याने रात्री ९ वाजता पुणे रेल्वे स्थानकातून निघाली. साधारणत: ही डेमू दौंड येथे रात्री १२च्या सुमाराला आल्यानंतर पुढे ती बारामतीला रवाना झाली. साधारणत: ही गाडी पुढे बारामतीला २ च्या सुमारास पोहोचली.डेमूची फेरी रद्दपुण्याहून बारामतीकडे येण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६.४५ ला सुटणारी डेमूची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी पूर्वीचीच कर्जत-बारामती पॅसेंजर सोडण्यात आली. तेव्हा सायंकाळच्या सुमाराला परतीच्या प्रवासासाठी डेमू लोकलऐवजी कर्जत-बारामती पॅसेंजर नित्यनियमाने सोडण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. डेमूची गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागेल. त्यातील तांत्रिक कारण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून प्रवाशांनी थोडा संयम बाळगावा़ शुक्रवारपासून डेमू आपल्या निर्धारीत वेळेवर सुटेल.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे
डेमूची रडकथा झाली सुरू
By admin | Published: March 31, 2017 2:41 AM