कर्वेनगर : कोथरूडमधील ग्रामस्थ अभिराज सुजित सुतार (वय १७, रा. कोथरूड गावठाण) याचा डेंगीच्या आजाराने मृत्यू झाला. जवळच असलेल्या उत्तमनगर येथील युवती सानिया भागवान (वय १८, रा. उत्तमनगर ) या युवतीचा डेंगीमुळे मृत्यू झाला. तिचा नुकताच साखरपुडा झाला होता.अभिराज याचे वडील सुजित म्हणाले की, पाच ते सहा दिवसांपासून अभिराज यास ताप येत होता. आम्ही कोथरूडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते. अभिराजच्या प्रकृतीमध्ये सुधारणा चांगल्या प्रकारे होत होती, पण दोन दिवसांत काय घडले समजत नाही. आमच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. या प्रकरणावरून कोथरूडमधील महानगरपालिकेचा आरोग्य विभाग किती सक्षम आहे, याचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना येत आहे.ते म्हणाले की, या ठिकाणी अनेक नागरिकांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागृती झाली पाहिजे. डासांची उत्पत्तीस्थळे हटविली गेली पाहिजेत.याबाबत आरोग्य विभाग वरचेवर फवारणी करत नसल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य कर्मचाºयांनी डासांची उत्पत्ती स्थळे हटविली, तर दु:खद प्रकार होणार नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
डेंगीमुळे दोघांचा मृत्यू, युवक आणि युवतीचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 6:19 AM