पुणो : थंडीने डेंगीच्या डासांचे प्रमाण आपोआप कमी होईल, असा अंदाज आरोग्य विभाग बांधत होते. मात्र, अवकाळी पावसाने या आशेवर पाणी फिरविले आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असल्याने पाणी साठून त्यात पुन्हा डासोत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे तापमानात होणारी वाढ डेंगीच्या डासांच्या वाढीसाठी पूरक ठरणार आहे. यामुळे आता पुन्हा डेंगीचा उद्रेक वाढण्याची भीती आहे.
पावसाळ्यामध्ये पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठून डासांची मोठय़ा प्रमाणात पैदास झाली होती. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली. पुण्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या 3 हजारांच्यावर पोहोचली. तर, काहींना आपला जीवही गमवावा लागला. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात थंडी पडेल आणि डासांची संख्या आपोआप कमी होईल, असा अंदाज पुणो महापालिकेचा आरोग्य विभाग आणि राज्याचा हिवताप विभाग बांधत होता. अशातच गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.
पुण्यातच डासांच्या उत्पत्तीच्या अनेक ठिकाणांमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होत असल्याचे गेल्या 2 महिन्यांत केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. यामुळे पालिकेला आता पुन्हा युद्ध पातळीवर तपासणी मोहीम आणि कीटकनाशक फवारणी सुरू करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)
पुन्हा युद्धपातळीवर उपाययोजना करणार
गेल्या 2 दिवसांपासून पडणा:या पावसामुळे शहरात पुन्हा डासोत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता थंडीचा हंगाम असल्याने थंडी पडून डासांची संख्या कमी होईल, असा अंदाज होता; पण शहरात अवकाळी पाऊस पडला. यामुळे आता पुन्हा डासांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येतील. यासंदर्भात आज महापौरांनी स्वयंसेवी संस्थांची बैठक घेतली आणि त्यांना 17 नोव्हेंबरला डासोत्पत्ती कशी रोखायची, डासांच्या अळ्या कशा ओळखायच्या, आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर शहरात मोठी जनजागृती रॅलीही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. संजय वावरे, प्रमुख, कीटकप्रतिबंध विभाग, पुणो महापालिका.
जनजागृती अभियानामुळे डेंगी वाढण्याची शक्यता कमी
राज्यशासनाच्या आरोग्य विभागातर्फे दि. 14 नोव्हेंबरपासून पुणो शहरासह पूर्ण जिल्ह्यात आरोग्य जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामसभा, वॉर्डस्तरीय सभा, स्वच्छता मोहीम, डेंगी उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याची मोहीम, आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती अभियानामुळे आता पाऊस पडला, तरी डेंगीचे डास पुन्हा वाढण्याची शक्यता नाही.
- डॉ. कांचन जगताप, सहसंचालक, हिवताप विभाग, महाराष्ट्र राज्य.