पुणे : शहरात या वर्षी आतापर्यंत एकूण ४५० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. संशयित रुग्णांची संख्या चार हजारांवर पाेहोचली आहे. यापैकी १२१ हे सर्वाधिक रुग्ण एकट्या सप्टेंबर महिन्यात आढळले. प्रशासनाकडून डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी आतापर्यंत २,७२१ जणांना नाेटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
डेंग्यू हा विषाणूबाधित एडिस एजिप्टाय डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून, या तापाचा प्रसार मानवापासून डास व डासांपासून पुन्हा मानव असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. काही रुग्णांच्या प्लेटलेट कमी हाेत असून, रुग्णांना रुग्णालयात ॲडमिट करून उपचार करावे लागत असल्याचे दिसून येते.
रोगांची सर्वसाधारण लक्षणे :
अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. रक्तस्रावित डेंग्यू ताप ही तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते. त्याचा सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात.
महिनानिहाय आढळलेले डेंग्यूचे प्रमाण
महिना - डेंग्यू - दंड
जानेवारी - १६ - १२ हजार
फेब्रुवारी - २८ - १,५००
मार्च - २२ - ४,०००
एप्रिल - ४२ - २,७००
मे - १८ - ४,३००
जून - १७ - ४,५००
जुलै - ६२ - ३९,७००
ऑगस्ट - ७३ - ८२,३७०
सप्टेंबर - १२१ - ३४,५००
ऑक्टाेबर (दि. ९ पर्यंत) - ५१ - १२ हजार
एकूण : ४५० - १ लाख ९७ हजार
सध्या डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे, पण दिलासादायक बाब म्हणजे ते क्रिटिकल हाेत नाहीत. या रुग्णांना ताप उच्च असताे, पण दाेन दिवसांनंतर उतरताे. प्लेटलेटही फार कमी हाेत नाही. झाल्या तरी परत वाढतात. घरातील साठवलेले पाणी झाकून ठेवावे.
- डाॅ.शिवाजी काेल्हे, जनरल प्रॅक्टिशनर, वडगाव बुद्रुक.