वाल्हे : येथील प्राथमिक अरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे अपघातातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाल्हे येथे मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्णांना उपचार न देताच येथील कर्मचारी व अरोग्यसेविकांनी हाकलून दिले. समाजसेवकांनी रुग्णांसह जाऊन असे होऊ नये, असे सांगण्यास गेलेल्या ग्रामस्थांनाच दादागिरी केली. तर, खासगी दवाखान्यातील रुग्णांची डेंगीची नोंद घेण्यास नकार दिल्याने कामचुकार वाल्हे प्राथमिक अरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कराळे यांचे निलंबन करण्याचा ठराव संमत करण्यात आला.समस्यांनी ग्रासलेल्या ग्रामस्थांनी वाल्हेच्या ग्रामसभेस हजेरी लावून कामचुकार अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी वर्गाला चुकांचा पाढा वाचून अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला. ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच कल्पना गोळे या होत्या. या वेळी ग्रामसेवक एस. बी. गाताडे, उपसरपंच पोपट पवार, ग्रामपंचायत सदस्य किरण कुमठेकर, सुशांत पवार यांच्यासह माजी उपसरपंच समदास भुजबळ, शांताराम पवार, पुरंदर भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सभापती व संजय गांधी निराधार योजनेचे अथ्यक्ष गिरीश पवार, शेतकरी संघटनेचे अॅड. फत्तेसिंग पवार, सतीश पवार, वाल्हे पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीरंग निगडे, प्रवीण कुमठेकर, सचिन देशपांडे, अमोल भुजबळ, धनंजय भुजबळ, वन विभाग व अरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होत. या वेळी महसूल, कृषी व शिक्षण या विभागांतील कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता, तर बहुसंख्य ग्रामस्थ व युवकांनी या सभेला हजेरी लावली.वाल्हे प्राथमिक अरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार हा येथील ग्रामस्थांच्या जिवावर बेतत असून अनेक गरीब रुग्णांना सेवा दिली जात नाही. त्यामुळे खासगी दवाखान्यात जावे लागत असून मोठा खर्च करावा लागतो. तर, येथील कर्मचारी व अधिकारी हे बेजबाबदारपणे कार्यरत असून, त्याला येथील वैद्यकीय अधिकारीच जबाबदार आहेत. यापूर्वीही वारंवार असे प्रकार झाले असून त्यांना निलंबित करण्यात यावे, असा ठराव करण्यात आला. शासकीय योजना व शेतकरी यांच्या विषयांचे वाचन झाले असता विहीर योजनेतील ६० गुंठे अशी जाचक अट रद्द करून ती लहान शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना धनंजय भुजबळ यांनी केल्या. तर, शासकीय योजनेत वाल्हेच्या ग्रामपंचायतीमध्येच काळाबाजर होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. येथील स्थानिक कर्मचारी बदल करीत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार भोंगळ होत असल्याचे उघड झाले. अनेकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दादागिरी व आरोग्यसेविकांची मनमानी हा विषय गोंधळ घालून गेला. या वेळी दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबनच करण्याचा ठराव करण्यात आला. तर, दारूधंदे बंद का होत नाहीत, यावर ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात आले. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून आम्ही कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. मात्र, कारवाई नको-बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)
डेंगी पेशंटला उपचाराविना हाकलले
By admin | Published: October 04, 2016 1:29 AM