सुपे : बारामती तालुक्यातील दंडवाडी अंतर्गत येणाऱ्या उत्तर खोपवाडीमध्ये काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या ठिकाणी घरटी रुग्ण आढळून येत असून डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने त्वरित सर्वेक्षण करुन उपाययोजना राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खोपवाडीत घरटी रुग्ण आढळून येत आहे. त्यातील काही जणांवर सुपे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असता डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याची माहिती डॉ. शौकत शेख यांनी दिली. महिन्याभरापासून येथील ग्रामस्थांचे आजारी पडण्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेऊन काही रुग्ण बरे झाले आहेत. मात्र अजूनही आजारी रुग्णांची संख्या जास्त आहे. येथील सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी सांगितले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शिवसेनेचे तालुका उपप्रमुख नामदेव चांदगुडे यांनी दिली. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची मागणी चांदगुडे यांनी केली आहे.
दरम्यान, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बाबुर्डी येथे आरोग्य विभागाच्या पथकाने घरटी सर्वेक्षण केले. या वेळी ३५ टक्के घरांमधून पाणीसाठा असलेल्या ठिकाणी डासाच्या आळ्या (लारवा) आढळून आल्या. त्यांचे त्याचवेळी पाणीसाठे नष्ट केले. तसेच घरातील उघड्यावरील पाणीसाठे नष्ट करावेत. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, घरात वावरताना अंगभर कपडे घालावीत. तर येत्या दोन दिवसांत खोपवाडी येथे जाऊन घरटी सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली.
१६ सुपे
बाबुर्डी येथे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या लारवा नष्ट करताना डॉ. वाघमारे व इतर.