वालचंदनगर : घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथे डेंगीचे सात रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांत सतत वाढ होत आहे. यापैकी एका रुग्णावर वालचंदनगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हिवताप, डोकेदुखी, सांधेदुखीने अनेक रुग्ण त्रस्त झाले. वातावरणातील बदलामुळे ,परिसरातील डबक्यात साठलेल्या पाण्यामुळे डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंगीचे सात रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. रेडणी, निरवांगी, निमसाखर ग्रामपंचायतीने धास्ती घेतली आहे. या परिसरातही उपाययोजना राबवण्यात यावी, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. डेंगीवर उपाय योजना राबविण्यासाठी घोरपडवाडी येथे पाच पथक कार्यरत आहेत .तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी सांगितले की, आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी घोरपडवाडीतील डेंगीवर मात करण्यासाठी सर्व तयारीने उपाययोजना राबवित आहेत. अचानक तीव्र ताप, सांधे दुखणे, डोळ्यातील खुबनी दुखणे, अंगदुखी,तोंडाची चव जाणे, छातीवर हातावर पुरळ येतात अशा रुग्णांनी ताबडतोब जवळच्या आरोग्य विभागात जाऊन सल्ला घ्यावा. (वार्ताहर)
घोरपडवाडीत आढळले डेंगीच सात रुग्ण
By admin | Published: August 19, 2016 5:50 AM