पुणे : डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने सध्या शहरात प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाढत चाललेली प्लेटलेट्सची मागणी अद्यापही कमी झालेली नसून त्यात वाढच होत चालली आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांना प्लेटलेट्स मागणी पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.पावसाळा सुरू झाला की शहरात दरवर्षी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते. यंदाही ही परिस्थती उद्भवली असून शहरात जुलै महिन्यापासून डेंग्युच्या संशयित रुग्णांची तसेच लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. आॅगस्ट महिन्यापासून यामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. सप्टेबर महिन्यात डेंग्यूचे १११४ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी २५१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आॅक्टोबर महिन्यात हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दि. १७ आॅक्टोबरपर्यंतच १०१९ संशयित रुग्णांपैकी लागण झालेले २९६ रुग्ण आढळले आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घटत जाते. सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच रक्तपेढ्यांकडे प्लेटलेट्सची मागणी वाढू लागली आहे. याविषयी माहिती देताना जनकल्याण रक्तपपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकणी म्हणाले, ‘डेंग्यूप्रमाणेच इतर विषाणूजन्य आजारांमध्ये सध्या प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही वाढ झाली आहे. नियमितपणे सधारणत एक ते दोन रुग्णांची मागणी होत असते. सध्या ही मागणी ८ ते १० हून अधिक रुग्णांपर्यंत गेली आहे. ही मागणी जास्त असली तरी मोठ्या रक्तपेढ्यांकडून सद्य:स्थितीत ही मागणी पूर्ण केली जात आहे. त्यासाठी स्वेच्छा रक्तदात्यांकडून सहकार्य मिळत आहे. दिवाळीच्या काळात रक्तदान शिबिरे होत नसल्याने काही प्रमाणात कमतरता जाणवत आहे.’‘शहरासह बाहेरगावांहूनही प्लेटलेट्सची मागणी होत आहे. नियमितपणे ६० मिलीच्या २० ते २५ बॅग प्लेटलेट्सची गरज भासते.ही मागणी सध्या १२५ बॅगपर्यंतगेली आहे. लक्ष्मीपुजन वपाडव्याच्या दिवशी रक्तदानशिबिर घेतल्याने ही मागणी पूर्णकरता आली. सध्या सुट्ट्यांमुळेशिबिरे होत नसल्याने प्लेटलेट्सची कमतरता जाणवत आहे,’ अशी माहिती आचार्य आनंदऋषिजी रक्तपेढीच्या प्रमुख हीना गुजरयांनी दिली.
डेंग्यूच्या डंखामुळे प्लेटलेटची वानवा, पुरवठा करताना रक्तपेढ्यांची कसरत, शिबिरे आयोजिण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:44 AM