- विशाल शिर्के पुणे : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची ओरड होत आहे. केवळ नागरी भागातच नाही तर शासकीय कार्यालये आणि शहरातील नामांकित शैक्षिणक संकुलातदेखील डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सीआयडी कार्यालयासह महत्त्वाची २१ सरकारी कार्यालये आणि तब्बल २२ महाविद्यालयांमधील डेंग्यूची उत्पत्तीस्थाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शोधून नष्ट केली आहेत.शहरात जानेवारीपासून तब्बल ६१८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधित १८१ रुग्ण जून महिन्यात आढळून आले आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत २५४ डेंग्यूने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. संशियत डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.ज्या महापालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यूची उत्पत्तीस्थाने कोणती आणि ती नष्ट करावीत याबाबत मोहीम राबवितो, त्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातदेखील डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. महावितरणचे कार्यालय, पोलीस ठाणी, पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारत, शहर मध्यवस्ती आणि उपनगरांतील महाविद्यालयांतदेखील डेंग्यूची उत्पत्तीस्थाने पोसली जात असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांचा वावर असणाऱ्या ठिकाणीच निष्काळजीपणा केला जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.।डेंग्यू उत्पत्तीस्थळे : पावसाचे पाणी साचू देऊ नका, आरोग्य विभागाची सूचनामहाविद्यालये : सावित्रीबाई फुले महाविद्यालय-भवानी पेठ, राजा धनराज गिरजी-रास्ता पेठ, सिम्बायोसिस कॉलेज-विमानतळ रस्ता, महाराष्ट्र कॉलेज आॅफ सायन्स-कोथरूड, मुक्तांगण हायस्कूल-सहकारनगर, जिल्हा परिषद शाळा-उंड्री, रोज लँड इंग्लिश मीडियम स्कूल-गोकुळनगर कोंढवा, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, गेनबा सोपानराव मोझे प्रशाला-येरवडा, डॉ. आंबेडकर कॉलेज-येरवडा, नारायण गेनबा मोझे विद्यालय-धानोरी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह-येरवडा, मराठवाडा कॉलेज, जगन्नाथ राठी कॉलेज, मॉडर्न कॉलेज-गणेश खिंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज-औंध, एस. के. पी. कॅम्पस अप्पासाहेब बालवडकर कॉलेज-बालेवाडी, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज-बालेवाडी, वाडिया कॉलेज-बंडगार्डन रस्ता, सेंट मीरा कॉलेज, सर परशुरामभाऊ विद्यालय, शाहू विद्यालय-पर्वती.सरकारी कार्यालये : पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत-पुणे स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशन, लोकमान्य पोस्ट आॅफिस, तलाठी कार्यालय-दत्तवाडी, पीडीसीसी बँक-लक्ष्मी रस्ता, अन्न व नागरी पुरवठा खाते- भवानी पेठ, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पोस्ट आॅफिस-मार्केट यार्ड, सहकार व पणन विभाग-मार्केट यार्ड, येरवडा पोलीस स्टेशन, महावितरण कार्यालय- येरवडा, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, कात्रज पीएमपी डेपो आगार, कोंढवा पोलीस चौकी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण-शिवाजीनगर, पोलीस मध्यवर्ती कर्मशाळा-औंध, सीआयडी-पाषाण, महावितरण, एमएसईडीसीएल-पाषाण, पोलीस बिनतारी संदेश विभाग-पाषाण.सरकारी कार्यालयांत आणि महाविद्यालयांत करण्यात आलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. येथील उत्पत्तीस्थाने महापालिकेच्या कर्मचाºयांनी नष्ट केली असून, संबंधितांना पत्र देण्यात आले आहे. तसेच, अशी उत्पत्तीस्थळे पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या आसपास पावसाचे पाणी साचू देऊ नये. शहाळी, नारळाची कवटी, फुटक्या बाटल्या, टायर अशा विविध ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती होण्याची शक्यता असते.- वैशाली जाधव, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका
महाविद्यालये, सरकारी कार्यालयांतून डेंग्यूचा प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:41 AM