शहरामध्ये संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले, मात्र त्यांच्या निवासाची पुरेशी व्यवस्था न झाल्याने महिला व पुरुष वारकऱ्यांना रस्त्यांवर रात्र काढावी लागल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले. महापालिका शाळांच्या ११० इमारती प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या, मात्र खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने त्यांना रस्ते, पदपथ यावर विसावा घ्यावा लागत आहे. शहरामध्ये संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकऱ्यांचे आगमन होते. दोन दिवस त्यांचा शहरामध्ये मुक्काम असतो. दरवर्षी पालिकेच्या शाळा वारकऱ्यांना निवासासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र वारकऱ्यांची संख्या पाहता ही व्यवस्था खूपच तोकडी पडत आहे. खासगी शाळांच्या मोठ्या इमारती शहरामध्ये आहेत, तिथे वारकऱ्यांची चांगली सोय होऊ शकते. महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी सांगितले, ‘‘वारकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील ११० इमारती त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांकडून केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांच्या इमारतींचीच मागणी होते. औंध, कात्रज अशा शहराच्या बाहेर असलेल्या शाळा त्यांना सोयीस्कर ठरत नाहीत.’’ पालखींचे आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त १४०० कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी मार्गावर ५३८ वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.बऱ्याच दिंड्यांमधील महिलांना अशा ठिकाणी जागा न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला पहुडण्याची वेळ आलेली दिसली. माळशिरसहून आलेल्या अंबिकाबाई म्हणाल्या, ‘‘आम्ही गेल्या २० वर्षांपासून पंढरीच्या वारीला येत आहोत. वारीत प्रत्येक क्षणी आमच्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे, कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. परंतु, रात्री उघड्यावर झोपायला लागत असल्याने काळजी मात्र लागून राहते. डोळ्याला डोळा लागत नाही. दोघींनी दोन तास झोपायचे, इतर दोघींनी जागे राहायचे; मग त्यांना उठवायचे आणि आपण झोपायचे, असे आम्ही आळीपाळीने ठरवून घेतो.’’
वारकऱ्यांच्या निवासाला खासगी शाळांचा नकार
By admin | Published: July 01, 2016 1:24 AM