येरवडा : येथील लक्ष्मीनगरमधील एका हॉटेलचालकास १० हजार रुपयांची खंडणी मागितली असता ती दिली नसल्याच्या रागाने चार-पाच जणांच्या टोळक्यांनी तलवारी घेऊन हॉटेलमध्ये घुसून आतील वस्तूंची तोडफोड झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यासिन मुथ्थु शेख (वय ३३, धंदा-हॉटेल व्यवसाय, रा. सर्व्हे नं. १२, गुलमोहर नर्सरीसमोर, हैदराबादी हॉटेल बिल्डिंग, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन शेख हे संबंधित पत्त्यावर दहा कामगारांसह राहण्यास असून हैदराबादी हॉटेलसमोर तीन वर्षांपासून स्वत: हॉटेल व्यवसाय चालवित आहेत. संबंधित हॉटेल मेहबूब शेख (रा. सर्व्हे नं. १२, लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्याकडून भाड्याने घेतलेले आहे.रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास यासिन हॉटेलमध्ये कामगारांसह कामात असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर दुसºया मोबाईलवरून फोन आला आणि फोन करणाºयाने त्याचे नाव शाहरूख ऊर्फ लाल सय्यद असे सांगून खंडणी मागितली. तेव्हा यासिन याने त्याला तू माझ्याकडे कसली खंडणी मागतोस, असे म्हणाला असता लाल याने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.परंतु यासिन यांनी त्याच्या धमकीकडे लक्ष दिले नाही आणि ते नमाजासाठी नमरा मस्जिद येथे गेले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील कामगार सुलतान खान (वय २३) याने त्यांना फोन करून सांगितले, की आपल्या हॉटेलवर शाहरूख सय्यद ऊर्फ लाल आणि त्यांच्या काही साथीदारांनी हातात तलवारी घेऊन येऊन हॉटेलच्या बाहेर असलेले चायनीज काऊंटर तोडले आणि हॉटेलमध्ये येऊन गल्ल्याच्या काऊंटरवर तलवारी मारून गल्ला बाहेर काढून गल्ल्यातील पाच हजार रुपये घेतले. तसेच शिवीगाळ करीत करीत त्याच्या हातातील तलवारी फिरवत त्याच्या साथीदारासह निघून गेला.शाहरूख सय्यद आणि त्याचे सहकारी फरार असून याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.फोनवरून जिवे मारण्याची धमकी१ या प्रकारामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी त्याच्या दहशतीने दुकाने बंद करून ते निघून गेले. असे सांगितल्यावर यासिन यांनी तत्काळ हॉटेलवर जाऊन पाहिले असता हॉटेलचे चायनिज काऊंटर, तसेच फ्रिज तुटला होता. त्यातील मालाचे नुकसान झाल्याचे दिसले. तसेच त्यांनी नमाजला जाताना गल्ल्यामध्ये पाच हजार रुपये ठेवले होते तेही गल्ल्यात दिसले नाहीत.२ हॉटेलमध्ये आल्यावर पुन्हा त्यांना दुसºया मोबाईलवरून फोन आला आणि फोन करणाºयाने त्याचे नाव शाहरूख सांगून, जिवे मारण्याची धमकी देऊन फोन बंद केला. त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.३ याप्रकरणी खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा शाहरूख आणि सहकाºयांवर येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत मारोडे अधिक तपास करीत आहेत.
खंडणी नाकारल्याने हॉटेलची तोडफोड, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:26 AM