पुणे : काही दिवसांपुर्वी नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे विमानसेवेवर विपरीत परिणाम झाला होता. आता पुण्यातील दाट धुक्यामुळेही विमान उड्डाणांवर परिणाम होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ९) सकाळी धुक्यामुळे पुण्यात येणारी दोन विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. तर ७ ते ८ विमानांचे उड्डाण व आगमन विलंबाने झाले. त्यामुळे सकाळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे दोन-तीन दिवस विमान वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्यातून दिल्लीला ये-जा करणाऱ्या काही विमानांना १ ते ४ तासांपर्यंत विलंब झाला होता. त्यामुळे प्रवाशांना खुप मनस्ताप सहन करावा लागला होता. पुन्हा पुण्यातील धुक्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सध्यातरी थांबला आहे. शहरातील तापमानात घट होऊ लागली असून सकाळी धुके पडू लागले आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यानंतर पडलेल्या दाट धुक्याचा विमान उड्डाणांवर परिणाम झाला. धुक्यामुळे काही अंतरावरील दिसणेही कठीण झाले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे विमानतळावरून विमान उड्डाणे थांबविण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्या काही उड्डाणांनाही विमानतळावर उतरण्यास मनाई करण्यात आली. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ६.५० वाजता चेन्नई (एसजी ५३०) आणि सकाळी ६.५५ वाजता बेंगलुरू (जी८ २८३) येथून येणारी विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही विमाने काही अंतराने पुणे विमानतळावर दाखल झाली. तसेच काही विमानांना विलंब झाल्याची माहिती विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दिली. पुण्यातून उड्डाण करणारे बेंगलुरू, नागपुर व दिल्लीकडे जाणाऱ्या तीन विमान उड्डाणांना विलंब झाला. तर बेंगलुरू आणि दिल्लीतून येणाऱ्या विमानाचे आगमन उशिराने झाले.
कोलकाताची उड्डाणे रद्द
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुलबुल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगालला बसणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ८) सायंकाळी ६ ते रविवारी (दि. ९) सकाळी ६ यावेळेत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या कालावधीत तीन विमाने कोलकाताला जातात. तर चार विमाने कोलकातामधून पुण्यात येतात. विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या किंवा अन्य विमानतळाकडे वळविण्यात आलेल्या उड्डाणांसाठी परतावा तसेच तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.