पुणे : शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेतर्फे एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन डासोत्पत्ती शोधमोहीम राबवीत आहेत. शहरात मंगळवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी पालिकेतर्फे १५०० घरांची तपासणी करण्यात आली. यातील १४८ ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने सापडली असल्याचे महापालिकेच्या लसीकरणकरण विभागाच्या सहायक प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये मंगळवारी एका दिवसात ७,१०० रुपयांचा दंड वसून करण्यात आला असून, ७४ जणांना नोटीस बजावण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. घरे, दुकाने, हॉटेल, गॅरेज, आॅफिस, बागा, अमृततुल्य या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. डासोत्पत्ती होईल, अशी ठिकाणे आढळल्यास त्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अॅबेट नावाचे औषध मारले जाणार आहे. यासाठी पालिकेने ३०० जणांची करार पद्धतीने नियुक्ती केली असून, शहराच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी २० जण काम करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दररोज कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ३०० घरांची तपासणी होणे आवश्यक असल्याच्या सूचना या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये आलेल्या अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू असून, लवकरच काम सुरळीत होईल, असेही डॉ. बळीवंत म्हणाल्या. याबाबत मोहिमेत सहभागी असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मोहिमेत येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आता १५ दिवसांसाठी ही मोहीम राबविण्यात येत असली, तरीही टप्प्याटप्प्याने ही मोहीम आॅक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. (प्रतिनिधी)