लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : दोन पेशंटला एकाच कंपनीच्या दातांच्या क्लिपचे वेगवेगळे दर सांगून पेशंटकडून जादा रक्कम उकळल्याने डॉक्टरांचे पितळ पेशंटसमोरच उघडे झाल्याने डॉक्टरांची चांगलीच भंबेरी उडाली़ मंचर येथील दातांचे डॉक्टर असलेल्या दाम्पत्यांचा अनुभव एका पेशंटला आला. विशेष म्हणजे ज्या पेशंटला अनुभव आला तो पेशंट डॉक्टरांच्या अत्यंत जवळचा नातेवाईकाचा मित्र असल्याने डॉक्टरांची मोठी पंचायत झाली़ नारायणगाव येथील दाम्पत्य हे आपल्या पत्नी व मुलीला दातांची क्लिप बसविण्यासाठी मंचर येथील नामांकीत डॉक्टर दाम्पत्यांकडे गेला होता. मितभाषी असलेले या डॉक्टर दाम्पत्यांकडे पुणे येथून तज्ज्ञ डॉक्टर क्लिप बसविण्यासाठी येत असतात़ डॉक्टर दाम्पत्याने पेश्ांटहा आपल्या नातेवाईकांचा मित्र असल्याने क्लिपचे दर स्वत: न सांगता हॉस्पिटल मधील सिस्टर व वार्डबॉय मार्फत दर सांगितले. चार कंपन्याचे क्लिपचे दर अनुक्रमे २२ हजार, २४ हजार, २५ हजार आणि ३२ हजार असे सांगण्यात आले़ संबंधितांनी २४ हजारांची क्लिप बसविण्याचे निश्चित केली व पत्नी आणि मुलीच्या क्लिपकरिता अॅडव्हान्स रक्कम १० हजार रुपये जमा केले़ रक्कम जमा केल्यानंतर मुलीला क्लिप बसविण्यासाठी डॉक्टरांनी आत नेले़ सचिन व त्यांची पत्नी डॉक्टर समोरच बसलेले होते़ याचवेळी दुसऱ्या पेशंटची तपासणी झाल्यावर तो पेशंट शेजारी बसला़ डॉक्टरने दाखविलेल्याच क्लिपा दुसऱ्या पेशंटच्या मुलाला दाखविल्या व त्या क्लिपांचे दर २० हजार, २२ हजार, २५ हजार असे सांगितले़ त्याचवेळी जी क्लिप निश्चित केली होती. त्याला दर २४ हजार सांगितला होता . हीच क्लिप दुसऱ्या पेशंटला २२ हजार रुपयास सांगितल्याने ही बाब त्या पेशंटच्या लक्षात आली़ मात्र महिला डॉक्टरच्या लक्षात आली नाही़ दर पाहिल्यानंतर पेशंटने डॉक्टरांना थेट प्रश्न करून या क्लिपचे आपण मला २४ हजार रुपये सांगितले व त्याच कंपनीची क्लिप या पेशंटला २२ हजार रुपये सांगितले़ आपणांस २ हजार रुपये प्रमाणे दोन क्लिपांचे ४ हजार रुपये वाढीव सांगितल्याचे निदर्शनास आणून देताच डॉक्टराचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच डॉक्टरने सारवासरव करीत दातांच्या गॅपनुसार क्लिपचे दर असतात, असे सांगून आपली चोरी लपविण्याचा प्रयत्न केला़
डेंटिस्टचे पितळ पेशंटसमोरच उघडे
By admin | Published: June 29, 2017 3:23 AM