(रविकिरण सासवडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : आगामी खरीप हंगामाची कृषी विभागाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती तालुक्यात सरासरी २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम घेतला जातो. मात्र, यावेळी तालुका कृषी विभागाच्या वतीने २५ हजार २६७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी २ हजार ६९५ क्विंटल बियाणाची मागणी तर ९ हजार २५९ मेट्रिक टन खाताचा साठा तयार ठेवण्यात आला आहे.
बारामती तालुका रब्बी हंगामात येतो. मात्र जिरायत पट्ट्यामुळे येथे खरीप हंगाम देखील महत्वाचा मानला जातो. तसेच बागायती पट्ट्यामध्ये देखील खरीप पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी होत असते. तालुक्यात ४७ बागायती गावे, ६२ पूर्ण जिरायती गावे, तर ८ गावे अंशता बागायत आहेत. खरीप हंगामात तालुक्यात प्रामुख्याने बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भुईमूग, सूर्यफुल, उडीद, मूग, तूर आदी पिके घेतली जातात. तर अडसाली उसाच्या देखील मोठ्याप्रमाणात लागवडी होत असतात. बारामती तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५७ मिमी इतके आहे. मागील दोन्ही खरीप हंगामामध्ये वरुणराजाची बारामती तालुक्यावर कृपा राहिली आहे. सलग दोन वर्षे विक्रमी पाऊसाची नोंद बारामतीमध्ये झाली आहे. २०१९-२० मध्ये ६४१ मिमी तर २०२०-२१ मध्ये ९४३ मिमी पाऊस बारामतीमध्ये झाला होता. यावर्षी देखील पाऊसाने चांगली साथ दिली तर खरीप हंगाम साधणार आहे. प्रमुख पिकांच्या पेरणी, व्यवस्थापन आणि उत्पादनाबाबत तालुका कृषी विभागाच्या वतीने ४४ शेतीशाळांचे नियोजन केले आहे. यामधील ११ शेतीशाळा या महिला शेतकऱ्यांसाठी असणार आहेत. तसेच पीक व्यवस्थापन आणि किड नियंत्रणासाठी कृषी विज्ञानकेंद्र बारामतीच्या तज्ज्ञ शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणवर्गाव्दारे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटाच्या माध्यमातून तालुक्यात १ हजार ७०० क्विंटल सोयाबीन बियाणाचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती उत्पादित बियाणामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यास बोगस बियाणे अथवा जादा किंमतीने खते देऊन फसवणूक केल्यास तातडीने कृषी विभागाकडे तक्रार करावी संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही तालुका कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
--------------------
चालू वर्षी हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतीशाळा, पाचट कुजवने अभियान, बीबीएफ द्वारे पेरणी, हुमणी व लष्करआळी नियंत्रण, आदी मोहिमा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
-दत्तात्रय पडवळ, तालुका कृषीअधिकारी, बारामती
---------------------
मागणी केलेले बियाणे (क्विंटलमध्ये)
बाजरी - ४९०
मका – १,३१०
उडीद – १५
तूर – ३०
मूग – १२०
भुईमूग – २६५
सूर्यफूल – १०
सोयाबीन – ४००
कांदा –५०
एकूण – २,६९५
--------------------
तालुक्यातील शिल्लक खतसाठा (मेट्रीक टन)
युरिया – २,५६५
पोटॅश – ५९४
सुपर फॉसपेट – ५६२
कॉमप्लेक्स – ४,८६२
डीएपी – ६७५
एकूण – ९,२६९
------------------------