पुणे: राज्यातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने शालेय शिक्षण विभागातर्फे विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) / राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त परीक्षेची (कंबाईन) तारीख सुध्दा आता आयोगाने जाहीर करावी,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, सातत्याने ढकलल्या जात असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या ९ ऑगस्ट रोजी तर अकरावी प्रवेशाची सीईटी येत्या २१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीने सुध्दा संयुक्त परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात.
एमपीएससीतर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली आहे.---------------------- एकूण किती जागांसाठी होणार परीक्षा : ८०६ पोलीस उपनिरिक्षक : ६५० राज्य कर निरिक्षक : ८९सहायक कक्ष अधिकारी : ६७