लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रकल्पाच्या पाणीवापराची अचूक माहिती मिळण्यासाठी व पाण्याची चोरी रोखण्याच्या प्रमुख उद्देशाने जलसंपदा विभागाच्या वतीने राज्यातील सर्व प्रकल्पांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
राज्यातील बहुतेक सर्वच प्रकल्पांमधून शेतीसाठी कालवा, नदीतून पाणी सोडण्यात येते. परंतु याबाबत योग्य माहिती नसल्याने पाणीचोरीसह, योग्य पाणीपट्टी आकारणी व थकबाकी वसुलीसाठी मदत होणार आहे. या सर्वेक्षणामुळे धरण प्रकल्पाचा जीआयएस नकाशा तयार होणार आहे. तसेच, कालव्यातून अथवा नदीद्वारे करून शेती करणाऱ्यांची माहिती, एकूण लाभार्थ्यांची संख्या, लागवडीखालील पिकांचे क्षेत्र आदींची माहिती एकत्रित मिळणार आहे. यामुळे सिंचन पाणीपट्टी आकारणी, त्याची वसुली तसेच पिकांच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. जलसंपदा विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या संगणक प्रणाली तयार करून माहिती अद्ययावत केली जाणार आहे.
याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व धरण प्रकल्पांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण लाभक्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. सद्य:स्थितीत यासाठीचा प्रकल्प अहवाल धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ड्रोन सर्वेक्षण झाल्यानंतर सिंचन व्यवस्थापन प्रणालीमधून विकसित होणाऱ्या मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नोंदी करून त्यानुसार पाणीपट्टी आकारणी व वसुली होणार आहे.
पहिल्या टप्प्यात खडकवासला धरण
पहिल्या टप्प्यात खडकवासला धरणाचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर सुमारे ७० हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. यामुळे पिकांचे नुकसान क्षेत्र, पिकांचे प्रकार, याचबरोबर पाण्याची होणारी चोरी लक्षात येणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून काम करण्यात येत आहे.