दिघी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरीकडे जाण्यास अधिक महिन्यातील ९ जुलैला गुरुवारी रात्री उशिरा प्रस्थान होणार आहे. काही खासगी पालखी सोहळ्याच्या पत्रकातील कार्यक्रमात चुकीच्या तारखा जाहीर केल्या असून, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चुकीची माहिती जात असल्याची माहिती सोहळामालक आरफळकर यांनी दिली.भाविक, नागरिक आणि पालखी सोहळ्यातील दिंडी मालक-चालक, व्यवस्थापक यांनी आळंदी देवस्थानाच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पालखी सोहळ्याच्या पत्रिका प्रसिद्ध करण्याचे आवाहनही मालक आरफळकर यांनी केले आहे. या वर्षी आळंदीत एकच मुक्काम आहे. सासवडला दोन दिवस, लोणंदला अडीच दिवस मुक्काम असून, दिशाभूल करणाऱ्या पत्रिकांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही खासगी पालखी सोहळ्यांनी छापलेल्या पत्रकांमध्ये आळंदीत दोन दिवस, सासवडला एक दिवस तर लोणंदला दोन दिवस मुक्काम असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चुकीची माहिती जात आहे. म्हणूनच वारकऱ्यांनी देवस्थानाची पत्रिकाच अधिकृत मानावी. आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळ्यातील मानकरी यांच्यातील चर्चेनंतर कार्यक्रम तयार केला आहे. ९ जुलैला आळंदीतील माऊली मंदिरातून श्रींच्या पालखी सोहळ्याचे रात्री उशिरा हरिनाम गजरात प्रस्थान होईल.पहिला मुक्काम आळंदी देवस्थानाच्या नूतन दर्शन बारी मंडपात विकसित केलेल्या जुन्या गांधीवाड्यातील जागेत होणार आहे. १० जुलैला सोहळा पुण्यनगरीत दोन दिवसांच्या पाहुणचारास विसावेल. इतर मुक्काम घेत २६ जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. अधिक महिना येत असल्याने सोहळ्यातील घटनेची नोंद घेत नियोजन करण्याचे आवाहन आरफळकर यांनी केले आहे. (वार्ताहर)
माऊलींच्या पालखीचे ९ जुलैला प्रस्थान
By admin | Published: May 13, 2015 2:45 AM