आळंदी : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २ जुलैला सायंकाळी चार वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार असून, विशेष वाहनाने माऊलींच्या चलपादुका पंढरपूरला जाणार आहे.
तत्पूर्वी, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून (दि. २८) आळंदी शहरासह नजीकच्या अकरा गावांमध्ये ४ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी तैनात करण्यात आली आहे. शहरात विना परवानगी प्रवेशास मज्जाव केला असून, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा आदेश यापूर्वी जारी करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी पाहता प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या शंभर वारकऱ्यांची बुधवारी (दि. ३०) आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चाचणीनंतर 'त्या' वारकऱ्यांना लगतच्या धर्मशाळेत एक दिवस वास्तव्यास ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमावली पाळून प्रस्थान सोहळा पार पडणार असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे - पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
प्रस्थान कार्यक्रम (दि.२ जुलै)
पहाटे ४ ते ५.३० : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती.
सकाळी ९ ते ११ : वीणा मंडपात कीर्तन
दुपारी १२ ते १२.३० : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य.
सायंकाळी ४ वा : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ.
सायंकाळी ६ वा. : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी.
प्रस्थाननंतर दि. ३ ते १९ जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार.
१९ जुलैला : माऊलींच्या चलपादुका सकाळी १० वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ.
१९ ते २४ जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी.
२४ जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास.
आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पॉलिश पेपरच्या साह्याने उजाळा देण्याचे काम सुरू आहे.(छाया : भानुदास पऱ्हाड)