आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे रविवारी (आज) सायंकाळी चारला तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे. माऊलींच्या वैभवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. तत्पूर्वी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
आळंदीत पालखी प्रस्थान सोहळयाच्या एक - दोन दिवस अगोदर असंख्य वारकरी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी नदीपलीकडील जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर पत्रे टाकले आहेत. या दर्शनबारीतून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलमार्गे मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही दर्शनबारी उभारली आहे. त्याद्वारे भाविकांना माऊलींच्या समाधीचे सुलभ दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.
दरम्यान आळंदीत दाखल झालेले भाविक ग्रंथ वाचण्यात दंग दिसून येत आहेत. सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहेत. आळंदीमधील तुळशी, हार, फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ साहित्य इ. विविध दुकाने सजली आहेत.
वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी - चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके व दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेचेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.