पिंपळवंडी येथून संत तुकाराम महाराज सेवा समितीच्यावतीने गेल्या एकवीस वर्षांपासून पंढरपूर पायी वारीचे आयोजन केले जाते. या पायी सोहळ्यात पिंपळवंडी आणि पंचक्रोशीमधील वारकरी या पायी सोहळ्यात सहभागी होत आहेत; मात्र मागील वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीवर या पालखी सोहळ्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे याहीवर्षी पालखी सोहळा अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आला. या वेळी पादुकांचे पूजन सत्यवान काकडे व वंदना काकडे यांच्या शुभहस्ते तर, वीणा पूजन निवृत्ती वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर हा पालखी सोहळा वाघपट्टा येथील दत्ता महाराज वाघ यांच्या निवासस्थानापासून निघाला. ग्रामदैवत मळगंगामाता मंदिर प्रदक्षिणा व ग्रामप्रदिक्षणा घालून हा पालखी सोहळ्याचे पुन्हा वाघपट्टा या ठिकाणी आगमन झाले. हा पालखी सोहळा आषाढी एकादशीपर्यंत वाघपट्टा या ठिकाणी दत्ता महाराज वाघ यांच्या निवासस्थानी विसावणार आहे. त्यानंतर या पालखी सोहळ्याचा समारोप होणार आहे.
या पालखी प्रस्थानप्रसंगी या पायी सोहळ्याचे संस्थापक हभप सखाराम चाळक गुरुजी, संत तुकाराम महाराज सेवा समितीचे अध्यक्ष रमणशेठ काकडे, जाणकू तोतरे गुरुजी, दत्ता महाराज वाघ, ह.भ.प. दादामहाराज गुंजाळ, नाथामहाराज भटकळ, कोंडीभाऊ वामन, साळवे महाराज, अशोक महाराज चिंचवडे, तान्हाजी काळे, निवृत्ती वाघ, मंगेश वाघ, सुरेश वाघ, शुभम महाराज, वामन पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सत्यवाननाना काकडे, नैनाताई बेलवटे, वंदनाताई काकडे आदी उपस्थित होते.
पिंपळवंडी येथील संत सावळेरामबाबा पिंपळवंडीकर दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.