पुणे: ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात आणि टाळ - मृदंगाच्या तालावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण अलंकापुरी ज्ञानोबा - तुकोबांच्या गजराने दुमदुमून निघते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
दरम्यान गुरुवारी निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल ३७ वारकऱ्यांना कोव्हीडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मंदिराच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे.
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य वारकरी आळंदीत येत असतात. प्रस्थान होण्याच्या पाहिले काही दिवस आळंदी परिसरात सर्वत्र वारीचे उत्साहपूर्व वातावरण दिसून येते आणि संपूर्ण आळंदी पंचक्रोशी माउली - तुकारामांच्या गजरात दुमदुमून जाते. मात्र यंदा मागच्या वर्षीप्रमाणेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाकडून मर्यादित वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. प्रस्थान सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या ३७ वारकऱ्यांना व देवस्थानातील १ कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने प्रस्थान सोहळ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
३ जुलै ते १९ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी राहणार असून दिनांक 19 जुलैला सकाळी 10 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने निघतील. त्यानंतर १९ जुलै ते २४ जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी राहतील आणि 24 जुलै ला पौर्णिमेचा प्रसाद घेऊन शासकीय बसने परतीच्या प्रवासाला निघतील.