देहूगाव (जि. पुणे) : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे खा. संभाजीराजे यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानानंतर मात्र पादुका १९ जुलैपर्यंत मंदिरातील भजनी मंडपात राहतील. वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे यांनी दिली.
संस्थानच्या फेसबुक व यू ट्यूबवरही पालखी प्रस्थान सोहळा दाखविण्यात येणार आहे. काकडआरतीनंतर सकाळी घोडेकर सराफांकडून पादुका मंदिरात येतील. तेथे मानकऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन होईल. सकाळी १० ते दुपारी १२ वाजता देहूकरांच्या वतीने काल्याचे कीर्तन होईल. यानंतर पादुका भजनी मंडपात प्रस्थानासाठी आणल्या जातील. तेथे दुपारी २ वाजता खा. संभाजीराजे, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विधिवत महापूजा होईल. दुपारी चारच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपाच्या बाहेर येईल. सायंकाळी सहाच्या सुमारास पहिल्या मुक्कामासाठी पालखी भजनी मंडपात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी मोजक्याच लोकांना पासधारकांचा प्रवेश दिला जाणार आहे.