नसरापूर - महाराष्ट्रातला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हे तालुक्यातील संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. या वेळी नसरापूर-माळेगाव येथील ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित विजय आठवले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नसरापूर येथे पालखीचे स्वागत केले.या पालखी सोहळ्यात आठवलेचे विद्यालयाचे चिमुकले वारकरी वेशात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत मीराबाई या संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.राजगडाच्या पायथ्यापासून संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान झाले होते. या पालखी सोहळ्यात नसरापूरपासून वेल्हा परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने महिलांची संख्या उल्लेखनीय होती.नसरापूर (ता. भोर) येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी नसरापूरचे माजी सरपंच हनुमंत कदम पाटील, डॉ. श्याम दलाल, काशिनाथ पालकर,बाबूशेठ बागमार, रामचंद्र पांगारे, मुरलीधर दळवी, सुरेश दळवी,राजेश वाल्हेकर, सुधीर वाल्हेकर, शिवाजी जाधव, यवले दाजी, चोपदार राजू कुंभार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागीझाले होते.नसरापूर बाजारपेठेतून पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना नसरापूर गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वारीतील वारकऱ्यांना फराळाचे वाटप करून वारीच्या प्रवासात लागणाºया आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:26 AM