बारामती : बारामती शहरांतर्गत हिरव्या रंगाच्या बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या, बंद पडणाऱ्या बसगाड्यांमुळे या सेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने आज प्रवाशी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांशी संवाद साधला. त्यात अनेक अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त आहेत. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा सप्ताहाची सुरुवात बारामती आगारात करण्यात आली. पण, ही सुरुवात फक्त कागदावर दाखविण्यापुरतीच मर्यादित होती, असे चित्र बारामती शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या बससेवेचे दिसत आहे. प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. प्रवाशांच्या तुलनेत कमी असणाऱ्या बस, बसचे अनियमित असणारे प्रमाण, बस बिघडण्याचे असलेले प्रमाण, बसच्या देखभालींकडे असलेले दुर्लक्ष झालेले दिसते. बारामती अंतर्गत बसस्थानकापासून ते एमआयडीसीमार्गे विमानतळापर्यंत ही अंतर्गत बससेवा आहे. मात्र, या बससेवा विस्कळीतपणे चालत आहे. या मार्गावरील बस या वेळेवर येत नसल्याची तक्रार तर नेहमीच चालू असते. सकाळची काही तास सोडले, तर १० नंतरच्या बस या कधीच वेळेवर येत नाहीत. यामुळे खासगी शिकवणी, कॉलेज, तसेच कामासाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्र्थी, तसेच नोकरदारांना नेहमीच पोहोचण्यास उशीर होतो. कधी या बस अर्धा तास, कधी १ तास, तर कधी दीड तासाने येतात. यामुळे विशेषत: मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे. त्यांच्याकडे कॉलेज किंवा शाळेत पोहोचण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी वाट पाहणे हा ‘एवढाच पर्याय’ असतो. शहरांतर्गत खासगी प्रवास करायचा असेल, तर त्याचे भाडे देणे म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. (वार्ताहर)४मागील काही दिवसांत शहरांतर्गत वाहतूक करणारी बस एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल गौरव’शेजारीच बंद पडली होती. तर या बसच्या देखभालीअभावी या बसमधून काळा धूर बाहेर पडत असतो. या धुरामुळे शहराच्या प्रदूषणात भरच टाकत असतो. तर बसने प्रवासी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास काढतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बस ही सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा ठरणारी असते. मात्र, बारामती आगाराने ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे.तुम्ही मागच्या बसने या४याबाबत विदारक अनुभव नाव न सांगण्याच्या अटींवर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘आम्ही कधी कधी १ ते दीड तास बसची वाट पाहत असतो. मात्र, या स्टॉपवर बस थांबत नाही. मागच्या बसने या.’ असे बऱ्याचदा वाहकांकडून सांगितले जाते. बऱ्याचदा बारामती बसस्थानकावर वाट पाहिल्यानंतर एकदम तीन बस येतात. मात्र, या तिन्ही बसचे वाहक दुसऱ्या बसमध्ये चढा. ही बस उशिराने जाणार आहे, असे सांगतात. या वागण्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. थांबा बनवलेत गतिरोधकांवर ४सुट्या पैशांअभावी होणारा त्रास हा तर प्रत्येक प्रवाशाला ठरलेलाच आहे. बहुतांशी वेळा बस या नेमून दिलेल्या थांब्याऐवजी आधी किंवा नंतर थांबत असते. शहरातील भिगवण चौकातील थांबा वगळता पंचायत समिती, श्रीरामनगर, हॉटेल सिटी इन येथील थांब्यावर बस कधी थांबतच नाही. कधी हा थांबा गतिरोधकांवर असतो, तर गतिरोधकांच्या आधी. मात्र, या थांब्यात प्रत्येक वाहकागणिक बदल होत असतो.