संतोष म्हस्के / नेरेशासनाचे धोरण नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा देण्याचे असले, तरी नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे सेवेचा बोजवारा उडाला आहे़ दिवसभरात पाच ते सहा तासच दवाखाना उघडा असतो़ या दयनीय अवस्थेमुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.भोर तालुक्याच्या दक्षिणेला वीसगाव खोऱ्यात दुर्गम डोंगरी नेरे गावात हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात सुरुवातीच्या काळात रुग्णांना योग्य सेवा मिळत असे; मात्र काही दिवसांनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केंद्रातील सेवेचा बोजवारा उडाला आहे़ वैद्यकीय अधिकारीच वेळेत हजर नसल्याने कर्मचारी याचा गैरफायदा घेऊन वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ रुग्णांना सेवा वेळेत मिळत नाही़ अनेक वेळा दवाखान्याला कुलूप असल्याने व कर्मचारी हजर नसल्याने महिलांना खासगी आणलेल्या वाहनातच बाळाला जन्म द्यावा लागतो़ तसेच, रुग्णांना आरोग्य केंद्राच्या बाहेरच तासन् तास डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते़ परिणामी, दवाखाना बंद असल्याने आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर रुग्णांना झोपून राहावे लागते़ या आरोग्य केंद्राच्या शेजारून भोर-मांढरदेवी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आसते़ या मार्गावर छोटे-मोठे अपघात होत आसतात. मात्र, अपघातांनतर रुग्णांना उपचारांसाठी शासकीय दवाखान्यात नेले जाते; परंतु दवाखानाच बंद असल्याने गंभीर जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेईपर्यंत आपला जीव गमवावा लागतो़ येथील रुग्णवाहिकेचा तुटलेला दिवा दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे ही रुग्णवाहिका आहे की वडापची गाडी, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण होत आहे़नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे़ याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भगवान पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुदर्शन मालाजुरे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करीत आहेत.समस्यांचा विळखा कायमच-नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे़ येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर राहत नाहीत, याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून यात राजकारण आणले जात आहे, असे उपसरपंच चंद्राकांत सावले यांनी सांगितले़ (वार्ताहर)रिक्त पदे : भरणार आमच्याकडे शिपाई, आरोग्यसेविका व बहुविध आरोग्यसेवक अशी तीन पदे रिक्त आहेत. ती लवकरात लवकर भरणार आहोत़ सध्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन व रुग्णांना आरोग्य सेवा वेळेत देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ़ धनंजय राऊत यांनी सांगितले आहे़
नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेचा बोजवारा
By admin | Published: May 05, 2017 2:16 AM