पुणे : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांसह, गुन्हे शाखा, विशेष शाखा, गृहरक्षक दल व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या देखील शहरात तैनात केल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली. तसेच मुख्यालयातील अतिरिक्त कुमक देेखील बंदोबस्तावर असणार आहे. यंदा कोरोनामुळे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणी, नाटक यांचे आयोजन न करता हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात सांगण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीवर देखील बंदी आहे. त्याऐवजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन, १० नागरिकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.