पुणे : रजा मंजूर करण्यासाठी भोर एसटी आगार व्यवस्थापक व चालकाला ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आगार व्यवस्थापक युवराज दिनकरराव कदम (वय ५२) आणि चालक विजय नामदेव राऊत (वय ५१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भोर एसटी आगारातील तक्रारदार यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई न करण्यासाठी तसेच रजा मंजूर करण्यासाठी व्यवस्थापक कदम यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्याची पडताळणी सोमवारी करण्यात आली. त्यात कदम यांनी ४ हजार रुपयांची लाचेची रक्कम चालक विजय राऊत याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार भोर येथील एसटी आगाराच्या कक्षाबाहेर सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराकडून लाच घेताना राऊत याला पकडण्यात आले. युवराज कदम याला ताब्यात घेण्यात आले. भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.