लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डीएसके कंपनीमध्ये सचिवपदी काम करणारे रोहित पुरंदरे यांना पोलिसांनी आरोपी करीत, त्यांच्या व आई-वडिलांच्या संयुक्त नावे असलेली त्यांची मुदत ठेव आणि बचत खाती गोठविली होती. ही खाती मुक्त करण्यासंदर्भात पुरंदरे यांच्या आई-वडिलांनी अर्ज केला होता. डीएसके यांच्या कंपनीत काम करण्याआधीची ही खाती असल्याचे पुरावे बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने पुरंदरे यांची मुदत ठेव आणि बचत खाती मुक्त करण्याचा आदेश दिला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जे. एन. राजे यांनी हा निकाल दिला.
रोहित पुरंदरे हे डीएसके कंपनीत 2018 साली सचिव म्हणून रुजू झाले. डीएसके यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, कंपनीतील प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले. त्यात रोहित पुरंदरे यांचा देखील समावेश आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराशी त्यांचा काही संबंध नसताना त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुरंदरे व त्यांच्या आई-वडिलांच्या संयुक्त नावे ठाणे जनता सहकारी बँक आणि एचडीएफसी बँकेत असलेली मुदत ठेव आणि बचत खाती गोठविण्यात आली. त्याबाबत पुरंदरे कुटुंबीयांनी ॲड. श्रीकांत पाटील व ॲड. अमित राठी यांच्या मार्फत न्यायालयात ही गोठविण्यात आलेली बचत खाती व मुदत ठेव खाती मुक्त करून मिळण्याबाबत अर्ज दाखल केला. या अर्जाच्या सुनावणीवेळी मुदत ठेव खाती रोहित पुरंदरे डीएसके यांच्याकडे नोकरीस लागण्या पूर्वीच्या होत्या व आहेत. त्यांचे पेन्शन देखील याच संयुक्त खात्यात जमा होते, असा युक्तिवाद ॲड. पाटील व ॲड. राठी यांनी केला आणि खात्याबाबतचे पुरावे देखील न्यायालयात सादर केले. न्यायालयाने पुरंदरे कुटुंबीयांचा अर्ज मंजूर करून पुरंदरे यांची बचत खाती व मुदत ठेव खाती व्याजासह मुक्त करण्याचा आदेश दिला.
------------------------------