पुणे: कसबा विधानसभा निवडणूकीत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवडणूकीत खरंतर रवींद्र धंगेकर व हेमंत रासने यांच्यातच खरी लढत होती. परंतु, अभिजित बिचुकले व हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी देखील आपला अर्ज भरला होता. या वेळी बिचुकले यांना ४७ तर दवे यांना २६६ मते पडली. ही मते वैध मतांच्या १/६ पेक्षा कमी आहेत. त्यामुळे १६ उमेदवारांपैकी १४ जणांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला.विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर अनेकांनी नोटाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारक उतरविले होते. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडुन बसले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे १० वेळा पुण्यात आले होते. तसेच महाविकास आघाडीकडूनही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते प्रचारासाठी पुण्यात येत होते. रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यावर ब्राह्मण उमेदवाराला तिकीट न दिल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे रासनेंच्या प्रभागात आघाडी मिळूनही धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही.