पुणे : लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन् पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिय्यर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ऋषिकेश मारुती उमाप (वय २९, रा. कावेरी पार्क सोसायटी, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
उमाप हा कावेरी पार्क सोसायटीत आईवडिलासमवेत रहात होता. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला होता. सकाळी तो दरवाजा उघडत नसल्याचे समजल्यावर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर ऋषिकेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली.
उमाप हा इंजिनियर असून लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो घरीच होता. तसेच, रात्र रात्र तो पबजी गेम खेळत होता. रात्री तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. सकाळी उशिरापर्यंत तो न उठल्याने घरच्यांनी दरवाजा वाजविला, पण आतून आवाज येत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.