पुणे : कामगार संघटनांच्या मागण्यांकडे राज्यकर्ते ढुंकुनही पाहत नसल्याने राज्यातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य पसरलेले आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार योग्यपणे कसा बजवायचा याची कामगारांची मानसिकता झाली आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात काहीतरी वेगळेच दिसतेय, असे निरीक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नोंदविले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार अरुण जगताप, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, मी अनेक निवडणुका पाहिल्या मात्र यावेळची निवडणूक वेगळी आहे. अनेक संस्थात्मक संघटना बैठका घ्यायला सांगतात. त्यावेळी ते परिवर्तनाची भाषा करताना दिसतात. आजचे राज्यकर्ते आमच्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत. अगदी भेटायला देखील सहा महिने ते वर्षांचा कालावधी लागतो, असे कामगार बोलून दाखवतात. राज्य मार्ग परिवहन विभागाची संघटना असो की प्राथमिक शिक्षकांची त्यांच्या मनात हीच भावना झाली आहे. संबंध महाराष्ट्रातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. आता, लोकशाहीने दिलेला अधिकार योग्य पद्धतीने बजवायचा अशी त्यांची मानसिकताही दिसून येत आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कामगारांचे सहा महिन्यांहून अधिक काळ वेतन दिलेले नाही. कारखाना अडचणीत असेल तर तो काही काळ तग राहू शकतो. त्याला विविध मागार्ने मदत करता येते. मात्र, कामगार इतका काळ कसा थांबणार. एखादा कारखाना कामगारांकडे माणूसकीने बघणार नसेल, तर आपणही संबंधित कारखान्यांच्या धुरिणांकडे विश्वासाने पाहू नये. अनेक कारखान्यांची स्थिती चांगली असतानाही त्यांची कामगारांची देणी देण्याची मानसिकता दिसून येत नाही. हे बरोबर नाही. भीमा पाटस, फलटण शुगरसह अशा कारखान्यांची यादी तयार करण्याची सूचना पवार यांनी या वेळी केली. -------------तर कामगारांचे नियंत्रण जाईल जवळपास ४० वर्षांपुर्वी मुंबईत गिरणी कामगारांचे संप नेहमीचेच असत. आता मात्र, संपाचे मनोधैर्य राहिलेले नाही. आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र, त्याची जबाबदारी कामगारावर राहणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले.
राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित दृष्टीकोनामुळे संघटित कामगारांमध्ये नैराश्य : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 7:06 PM
आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र,
ठळक मुद्देसरकारच्या कामगिरीविरोधात करतील परिवर्तन