मागील दीड वर्षापासून भोर तालुक्यातील गोरगरीब महिलांना प्रसूतीची गैरसोय, सर्पदंश, कुत्र्याची लस, अपघात झाल्यास योग्य ते उपचार वेळेत मिळत नाही. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण आणि शहरी नागरिकांना मनःस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भोर शहरातील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू असून मागील दीड वर्षापासून येथील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वर्षापूर्वी दरमहा ४५ ते ५० गर्भवती महिलांची प्रसूती व सिझर शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र ती सध्या पूर्णपणे बंद असून ती अन्य कोठे तरी प्रशासनाने सुरू केली आहे. मोफत प्रसूती होत नसल्याने खासगी दवाखान्यातील अवाच्या सव्वा फी आमच्या कुटुंबाला परवडत नाही, असा सूर भोर शहरासह ग्रामीण भागातील महिला व त्यांच्या कुटुंबांकडून येत आहे.
गर्भवती महिलांची उपजिल्हा रुग्णालयात होणारी नियमित तपासणी बंद झाली असून, महिलांची सोनोग्राफीही होत नसल्याने तालुक्यातील गर्भवती महिलांचे रुग्णसेवेअभावी मोठे हाल होत आहे. या रुग्णालयात सध्या कोणतेच उपचार मिळत नसून, सर्पदंश, कुत्र्याची लस मिळवण्यासाठीही रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. साधे टीटीचे इंजेक्शन टोचून घेण्यासाठी खासगी दवाखान्यात १०० रुपये द्यावे लागत आहेत. ओपीडीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवेअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, पर्यायी सेवाही योग्य वेळी मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे. ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले. मात्र उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यामुळे येथे सर्पदंश, कुत्र्याची लस मिळत नाही. त्यासाठी रुग्णांना नेरे किंवा आंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. अनेकदा लस उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. यात अनेकदा रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.