पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमण कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापालिकेत निर्दशने करण्यात आली.
या वेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त यांचे कार्यालय, तसेच महापौरांचे कार्यालय गाठले. परंतु महापालिकेत कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने व संबंधित अधिकारी फोनही घेत नसल्याने अखेर, कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणाही देण्यात आल्या.
खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी स्थानिक नगरसेवक व प्रशासनातील अधिकारी यांच्या संगनमताने ही कारवाई झाल्याचा आरोप या वेळी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांनी केला. या वेळी महिला अध्यक्ष अनिता चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, महासचिव अॅड. अरविंद तायडे, जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रवक्ते गौरव जाधव उपस्थित होते.