पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समितीने कॅसचे लाभ देण्यासाठी पात्र ठरवलेल्या काही प्राध्यापकांचे प्रस्ताव शैक्षणिक संस्थांकडून विद्यापीठाकडे सादर करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी हे प्राध्यापक पदोन्नतीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नौरोजी वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना कॅस अंतर्गत दिले जाणारे लाभ मिळावेत. या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठाने प्राध्यापकांच्या कॅसच्या मुलाखती घेतल्या. तसेच तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविले. त्याचप्रमाणे संलग्न महाविद्यालयांना पात्र ठरलेल्या प्राध्यापकांचे अहवाल विद्यापीठात सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काही महाविद्यालयांनी या प्रक्रियेस विरोध केला. त्यामुळे विद्यापीठाने पात्र ठरवलेले असतानाही प्राध्यापक कॅसच्या लाभापासून वंचित आहेत. काही प्राध्यापक सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी कॅसचे लाभ मिळू नयेत म्हणून काही संस्था जाणूनबुजून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेली कॅस प्रक्रिया चुकीची असल्याचे काही संस्थाचालकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, विद्यापीठाने तत्पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. तसेच प्राध्यापक संघटनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. परंतु, तरीही न्याय मिळत नसल्याने प्राध्यापकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---
विद्यापीठाने पत्र पाठवूनही नौरोजी वाडिया महाविद्यालयाने अकरा प्राध्यापकांपैकी केवळ पाच प्राध्यापकांचे प्रस्ताव सादर केले. उर्वरित सहा प्राध्यापकांचे प्रस्ताव अद्याप सादर केलेले नाहीत. त्यातील काही प्राध्यापक सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, नौरोजी वाडिया महाविद्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राध्यापक संघटनेच्या या आंदोलनास पाठिंबा आहे.
- एस. एम. राठोड, अध्यक्ष, पुटा