पुणे : एक अनोखी पहाट... रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट आणि दिव्यांचा झगमगाट, तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचं ताट, गोडाचा घास, नव्या कपड्यांचा साज या सार्यांचा अनुभव घेत फुटपाथवर राहणार्या वंचित मुलांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला.निमित्त होते दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या शाही अभ्यंगस्नानाचे. खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणार्या या मुलांची सोमवारची सकाळ मात्र आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि मांडलेले पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली. आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल आणि समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात हा शाही अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणार्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे , फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने यांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर हा सुखद सोहळा पाहणार्या 'त्या ' मुलांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहावयास मिळत होते. या उपक्रमात रोटरी क्लब शनिवारवाडा या संस्थेचे पदाधिकारी अॅड. चंद्रशेखर पिंगळे, अभिषेक बागुल, गोरख मरळ, श्याम काळे, सोमनाथ कोंडे, महेश ढवळे, हेमंत बागुल, सागर आरोळे, विक्रम खन्ना, अशोक शिंदे, विजय बिबवे, धनंजय कांबळे, सुरेश कांबळे, योगेश निकाळजे, इम्तियाज तांबोळी, राहुल बागुल, राजाभाऊ पोळ, सुयोग धाडवे, दीपक गोरखा, पंकज गायकवाड हे सहभागी झाले होते.
'त्यांनी' लुटला अभ्यंगस्नानाचा शाही आनंद!, दिव्यांचा झगमगाट अन् तेल-उटण्याचा सुवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:00 PM
दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देवंचित मुलांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला.हा शाही अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणार्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता