बारामती: बारामतीच्या कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सूळे,सुनेत्रा पवार या एकाच मंचावर एकत्रित आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डुु ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पहावयास मिळाले. मात्र,या मध्ये कोणाचाही अपेक्षित संवाद रंगला नसल्याचे चित्र आहे.
लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्या, नणंद भावजय देखील एका मंचावर एकत्र दिसून आले. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोबोटने सत्कारासाठीचं लहान रोपटं आणलं. जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचं मंचावर पुकारण्यात आलं तेव्हा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचाही सत्कार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दोन मंत्री याठिकाणी आले आहेत. आपण पुन्हा याठिकाणी याल अशी अपेक्षा आहे. आता वर्षभर कुठलेही इलेक्शन नाहीय, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छाही सुप्रिया सुळे यांनी सर्वांना दिल्या.
सभागृहात एकच हशा पिकला
सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. अजित दादांना माहिती आहे मी उशिरा उठतो. दादांनी रात्रीच सांगितलं होतं. उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटलं जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच त्यावेळी पाठीमागे उभा होतो, अशी मिश्कील टीपणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
अजित पवारांचे प्रत्येक काम नियोजनबद्ध
एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज प्रथमच योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे,अशा शब्दात पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काैतुक केले.
भाषणाची सुरुवात ‘आदरणीय पवारसाहेब’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात ‘आदरणीय पवारसाहेब’ ,यांच्यासह विविध उपस्थित मंत्र्यांचा नामोल्लेख करुन केली. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता थेट भाषणाला केली. ज्येष्ठ नेते पवार नेहमीच त्यांच्या भाषणाची सुरवात उपस्थित मान्यवरांची नावे घेवून करतात. मात्र, आजचे त्यांचे भाषण अपवाद ठरले.