शिंदे, फडणवीसांना नमस्कार, पण नरेंद्र मोदींनी अजितदादांना दिली थाप; व्हिडिओची रंगली चर्चा
By मुकेश चव्हाण | Published: August 1, 2023 02:39 PM2023-08-01T14:39:41+5:302023-08-01T14:44:44+5:30
अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांचा देखील एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक दिलेल्या महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी प्रणाम देतो, असे मराठीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची मने जिंकली. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते.
मोदी-पवार भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात थोडासाच, पण दिलखुलास संवाद झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, शरद पवारांनी मोदींचा हात हाती घेऊन, त्यांची पाठही थोपटल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. आता अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांचा देखील एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'
लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदींनी स्वीकारला. नरेंद्र मोदींसह विविध मान्यवरांचे भाषण झाले. हा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांची पुन्हा एकदा भेट घेतली. यावेळी राज्यपाल राजेश बैस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केला. पुढे अजित पवार होते. त्यांना मात्र हात न मिळवता अजितदादांच्या हातावर नरेंद्र मोदी यांनी थाप दिल्याचं पाहायला मिळाले. अजितदादांनी देखील स्मितहास्य करत प्रतिसाद दिला.
दरम्यान, मी इथे येऊन खूप भावूक झालो आहे. भारताचे गौरव आणि आदर्श लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. लोकमान्य हे आपल्या देशाचे तिलक आहेत. तसेच अण्णाभाऊ यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दोन्ही व्यक्तींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आज पुण्याच्या पावनभुमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ही पुण्यभूमी शिवरायांची धरती आहे. या धरतीवर ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. त्या भुमीवर मी आज आलो आहे. आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
#LIVE | #पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान सोहळाhttps://t.co/xhiUL3Y6ac
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 1, 2023