'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:32 PM2021-06-04T21:32:28+5:302021-06-04T21:40:11+5:30

नारायण राणे यांच्या या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized BJP MP Narayan Rane | 'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

Next

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आरक्षण द्यायचे नाही. शिवसेनेचा आरक्षणाला विरोध आहे असा, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ४ वेळा मुख्यमंत्री होते. मात्र त्यावेळी हा मुद्दा आलाच नाही. यावरूनच कळते काय ते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांनी टोला लगावला होता. नारायण राणे यांच्या या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

नारायण राणेंनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का दिलं नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हे काय नारायण राणेंना समजत नाही का, असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला. त्याचप्रमाणे नारायण राणेंना समितीत घ्या, ही माझीच सुचना असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.  पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट शरद पवार आजारी होते म्हणून झाली. माणुसकीच्या नात्याने भेट झाली आहे. मी उद्या भाजपाच्या नेत्याला भेटायला गेलो, म्हणून काय जवळीक साधली असं होत नाही, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटलांना चिमटा-

भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील मोठे माणूस आहेत. मी बोलायला लागलो तर फटकळ म्हणाले. ते सारखे झोपेतून जागा होऊन सरकार पडलं का म्हणत असतात. त्याचं हे चॅनल बघ, ते चॅनल बघ सुरु असतं, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. 

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा-

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह ग्रामीण भागात गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे. ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सार्वजनिक समारंभाला गर्दी करू नये, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅन्टची वेळोवेळी तपासणी करून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावा, कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 
 

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized BJP MP Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.