'दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, त्याच्या चेहऱ्यावर...'; अजित पवार काय म्हणाले? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:20 AM2024-02-09T09:20:50+5:302024-02-09T09:34:17+5:30
यामागचं खरं कारण समोर आलं पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितले.
फेसबुक लाइव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
सदर घडलेल्या घटनेवरुन राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घडलेली घटना अतिशय चुकीची आहे, असं म्हटलं आहे. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडताच कामा नये, या मताचा मी आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी आज सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
व्हिडीओमधून चांगला संवाद सुरु होता. त्यांचे दोघांचं संभाषण ऐकल्यानंतर दोघांचे मित्रत्वाचे संबंध होते, चांगले संबंध होते, असं दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये आरोपी गोळीबार करणार असं चेहऱ्यावरुन वाटलं नव्हतं. म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर एक होतं, आणि मनात वेगळं होतं, असं अजित पवार म्हणाले. या घटनेचा नीट तपास व्हायला हवा. यामागचं खरं कारण समोर आलं पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितले.
सदर घटनेवरुन विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. विरोधकांना हे निमित्त मिळालं आहे. मी पुन्हा सांगतो, घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. मात्र यामागची पार्श्वभूमी देखील बघायला हवी. दोघं एकमेकांशी येवढं चांगलं बोलत असताना, हसत असताना, नेमकं काय घडलं, हे पाहायला हवं. काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील या घटनेवरुन चर्चा झाली, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.