उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू माणसाला गमावलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:03 PM2021-04-08T20:03:36+5:302021-04-08T20:49:06+5:30
अजितदादांनी ‘काहीही करा पण जालिंदरला बरं करा,अशी संबंधित डॉक्टरांना सूचना केली होती...
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी (ता. बारामती) येथील अत्यंत विश्वासू कर्मचारी शेती व मुकादम जालिंदर शेंडगे यांचं बुधवारी निधन झाले.
जालिदर शेंडगे हे फेब्रुवारी महिन्यातच आजारी पडले होते.त्यांच्यावर बारामती शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर ‘अजितदादां’चा दिनक्रम अतिशय व्यस्त होता. त्याचवेळी एका कार्यक्रमात दादांना शेंडगे आजारी असल्याचा निरोप देण्यात आला होता. ‘जालिंदर खूप आजारी असल्याचा निरोप ऐकताच दादांमधील कुटुंबप्रमुख जागा झाला होता.दादांनी तिथूनच फोनाफोनी करीत ‘काहीही करा पण जालिंदरला बरं करा,अशी संबंधित डॉक्टरांना सूचना केली होती. जालिंदर जोवर दवाखान्यात जात नाही, तोपर्यंत दादा स्वत: पाठपुरावा करत होते.
जालिंदरवर उपचार सुरू झाल्यावरच दादांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला.याबाबत दादांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.त्यानंतर रोखठोक दादांच्या स्वभावातील हळवेपणा उघड झाला होता.त्यामुळे जालिंदर शेंडगे यांची चर्चा राज्यात रंगली होती. त्यांचे बुधवारी (दि. ७) निधन झाले.
दादांना लहानपणी स्वत: सायकल वरून शाळेत सोडणे,त्यांच्या शेतातील गायांच्या धारा काढणे ,गाईचे गोठ्यातील शेण काढणे आदी जबाबदाऱ्या शेंडगे पार पाडत होते. दादांचे ते विश्वासु कर्मचारी होते.
.....