बारामती- महायुतीत सहभागी झाल्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केेले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सरकारच्या बाहेर राहिलो असतो तर आंदोलन, उपोषण, मोर्चा इतकच करायला लागले असते. मागे शिवसेनेसोबत जायला सांगितले, आपण गेलो. भाजपलाही बाहेरून पाठिंबा दिला. त्यांच्या कारकिर्दीत ते जे म्हणतील, ते सर्व केले. मुख्यमंत्रीपददेखील आपण काँग्रेसला दिले. जे जे सांगितलं, ते ते सगळं ऐकलं, पण आता भावनिक व्हायच नाही, अशी टीका यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
शिर्सुफळ (ता. बारामती) येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, बारामती लोकसभा निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती व माढा दोन्ही लोकांनी निवडून दिले. त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यालाही मान्यता दिली. नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं. कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे. शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळे काम करायचो.
मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही. अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते. त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा, असे पवार म्हणाले.
काहीजण माझी सभा झाली की समोरच्या लोकांकडे जातात, पदे मी देवून त्यांचा प्रचार करतात. त्यांनी कोणाच एकाचेच कुंकु लावावे. हा काय चावटपणा लावलाय, हे झाकुन राहत नाही. जर माझ्याबाबत काही चुूक झाल्यास त्यांनी माझ्या घराची पायरी चढायची नाही, असा इशारा दोन्हीकडे संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी दिला.
शिर्सुफळ येथील भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुर्वीच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभुमीवर वक्तव्य केले. ते म्हणाले,काही वर्षांपुर्वी चुकून ते वक्तव्य माझ्या तोंडातून गेले, त्याचा फार मोठा फटका मला बसला. त्यावेळी जे वाक्य मी वापरले होते, त्यातून मला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते व्हापासून मी माझ्या मेंदूला शब्द जपुन वापरायचे आहेत, असे सातत्याने सांगतो, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.